एटीएसने रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी घेतले ताब्यात

मुंबई, २७ जुलै २०२३ : नुकतीच दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

एका गुप्त माहितीनुसार कारवाई करत एटीएसच्या नवी मुंबई युनिटने, एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे एटीएसने सांगितले. गेल्या आठवड्यात पुण्यात अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवादी संशयितांच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसने नुकताच हाती घेतला होता.

तपासादरम्यान आणखी काही लोकांची नावे समोर आली, त्यानंतर एटीएसच्या पथकांनी अनेकांची चौकशी सुरू केली. या आधी राजस्थानमधील एका दहशतवादाशी संबंधित प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए), १८ जुलैच्या पहाटे पुणे पोलिसांनी शहरातील कोथरूड भागातून अटक केलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीदरम्यान नवीन खुलासे होत आहेत.

पुणे न्यायालयाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४) या दोन संशयितांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दहशतवादी संशयित आणखी एका व्यक्तीसह जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा