नवी दिल्ली, १० एप्रिल २०२३ : गेल्या काही दिवसांपासून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून बेशिस्तपणाच्या घटना समोर येत आहेत. आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI १११ विमानात एका प्रवाशाने क्रू सोबत हुज्जत घालत थेट हल्लाच केला आहे.
एअर इंडियाने या घटनेची गंभीर दखल घेत विमान पुन्हा दिल्लीकडे वळवले. बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशाला सुरक्षा रक्षकांकडे सोपवण्यात आले असून, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान दिल्लीहून लंडनकडे जाण्यासाठी झेपावले. यानंतर काही वेळातच विमानातील प्रवाशाने बेशिस्त वर्तन सुरू केला.
विमानातील दोन क्रू प्रवाशांनी गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशाला शाब्दिक आणि लेखी सुचना दिल्या, परंतु त्यांने गैरप्रकार करणे सुरुच ठेवले व थेट केबिन क्रूवर हल्ला केला. पायलटने विमान पुन्हा दिल्ली विमानतळाकडे घेत संबंधित प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. विमान कंपनीने या घटनेबाबत दिल्ली विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर