बीड, दि.१० मे २०२० : सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून जिल्ह्याच्या प्रत्येक भागात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मात्र, यात नागरिकांकडून पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. आष्टी गावात तोंडाला मास्क न बांधता दुचाकीवर फिरणार्यास पोलीसांनी अडवले. या गोष्टीचा राग मनात धरुन दुचाकीवरील दोघा भावांनी चक्क पोलीस कर्मचार्यासह होमगार्डवर हल्ला चढावला.
या मारहाणीत एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी (दि.९) रोजी शहरातील कमानवेशीजवळ घडला. याबाबत दोघा भावांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात या वेळेत होणारी गर्दी लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी व होमगार्डस नियुक्त केलेले आहेत.
शनिवारी सकाळी कमानवेशीजवळ पोलिस शिपाई सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे बंदोबस्तावर होते. या वेळी शांतीनाथ राजाराम फुंदे (वय ४०) व शरद राजाराम फुंदे (वय ४५, दोघे रा. शेकापूर, हल्ली मुक्काम पुणे) हे दोघे भाऊ बाजारपेठेत आले. तोंडाला मास्क न बांधता ते बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना मज्जाव केला.
याचा राग मनात धरून या दोघांनी सचिन कोळेकर, रियाज पठाण व शैलेश वांढरे यांना काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत वरील तिघे जण जखमी झाले.
पोलिस शिपाई सचिन कोळेकर यांच्या डोक्याला काठीचा जोरात मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रियाज पठाण यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनाथ फुंदे व शरद फुंदे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: