गोल पोस्ट महाराष्ट्र ‘गद्दार-खोके दिन’ साजरा करण्याचा प्रयत्न, मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

‘गद्दार-खोके दिन’ साजरा करण्याचा प्रयत्न, मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

मुंबई २० जून २०२३: मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असा इशारा दिलाय. दरम्यान दक्षिण मुंबईत खोके दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह काही नगरसेवकांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आली आहे.

नागपाडा परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार निषेध दिन आंदोलन करण्यात आले. पन्नास खोके, एकदम ओके असे फलक यावेळी झळकले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यांनी गेल्या वर्षी २० जून २०२२ रोजी ठाकरेंची साथ सोडली. यामुळे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

याबाबत राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघाला एक पत्र लिहिले आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने काल एकाच दिवशी म्हणजेच १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन वेगवेगळा साजरा केला. याचदरम्यान राऊत यांनी २० जून गद्दार दिन जाहीर करण्याची मागणी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version