बीड, २८ जून २०२० : कोरोनाच्या या संकटकाळात नागरिक आधीच संतप्त आहेत त्यातच बोगस बी बियाण्यांमुळे शेतकरी खचून गेले आहेत. सर्वत्र चांगला पाऊस पडला आहे. शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी देखील सुरू झाली आहे. परंतु बोगस बी बियाणे पेरल्यानंतर मात्र पिक उगवत नसल्याने शेतकरी हा खचून गेला आहे.
बीड जिल्ह्यातील नांदूर घाट या परिसरातील बियाणे विक्री दुकानात लालासाहेब दादाराव तांदळे हे सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याने जाब विचारण्याकरिता गेले. संतप्त होऊन या वृद्ध शेतकऱ्याने त्या दुकानासमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान साधून फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड यांनी त्या शेतकऱ्याच्या अंगावर पाणी टाकून हा अनर्थ टाळला.
सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.खरीप हंगामाचा काळ असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २०० शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर पिक उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नव्याने दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खत आता आणावे कोठून असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड