जागतिक महिला दिनानिमित्त महिला आमदारांच्या आज लक्षवेधी; विधानसभा कामकाजात महिलांना प्राधान्य

मुंबई, ८ मार्च २०२३ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज, बुधवारी विधानसभा कामकाजात महिला लोकप्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आजच्या कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवण्यात आल्या आहेत.

तारांकित प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे सभागृहात ठेवली जातात. त्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा होते. आज ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय आठ महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला येणार आहेत. त्यात भाजपच्या देवयानी फरांदे, डॉ. भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, शिवसेनेच्या यामिनी जाधव, काँग्रेसच्या जयश्री जाधव, यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या महिला आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आधुनिक महिला धोरण तयार करण्याच्या संदर्भात ठराव मांडणार आहेत. राज्य सरकारचे १९९४, २००२, २०१४, २०१९ चे प्रस्तावित धोरण; तसेच २००१ चे राष्ट्रीय महिला धोरण यांचे एकत्रीकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचा हा ठराव आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा