ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४६ लाखांची फसवणूक!

Attractive on WhatsApp group
एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल ४६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक

ही फसवणूक १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली.

Attractive on WhatsApp group:व्हॉट्सअॅप ग्रुपवर आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल ४६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना जुनी सांगवी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी आप्पासाहेब महादेव कोष्टी (वय ५४) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अन्या स्मिथ, विक्रम नादार, आदित्य शर्मा, आदित्य अग्रवाल यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही फसवणूक १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला व्हॉट्सअॅपवरील ‘विक्रम नादार’ नावाच्या ग्रुप अॅडमिनने फिर्यादीला ‘एज्क’ नावाचे एक ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. ग्रुपवर इतर सदस्यांना गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळत असल्याचे स्क्रीनशॉट दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास जिंकला. यावर विश्वास ठेवून कोष्टी यांनी ३१ लाख ८० हजार रुपयांची मोठी रक्कम गुंतवली.

त्यानंतर, अन्य एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘आदित्य शर्मा’ आणि ‘आदित्य अग्रवाल’ यांनी दुसऱ्या एका कंपनीचे ॲप डाउनलोड करायला सांगितले. त्यातही गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्यांच्याकडून आणखी १७ लाख ८० हजार रुपये गुंतवून घेतले. अशा प्रकारे, आरोपींनी वेगवेगळ्या माध्यमातून एकूण ४६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर गुन्हेगार सोशल मीडियाचा वापर करून लोकांना कशा प्रकारे जाळ्यात अडकवत आहेत, याचे हे एक ताजे उदाहरण आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे