सीएसके आणि मुंबई इंडियन्समध्ये दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलाव

मुंबई, २३ डिसेंबर २०२२ : कोची येथे इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावात आयपीएलचे दोन सर्वांत मोठे संघ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचाही समावेश आहे. शक्यतांचा अभ्यास करता या लिलावात कमी खेळाडूंवर बोली लावावी लागली तरीही फ्रॅंचायझींमधील काही खेळाडूंसाठी हा लिलाव खडतर आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांकडे २० कोटींहून अधिक रुपये शिल्लक आहेत. दोन्ही फ्रॅंचाईजींना सारख्याच खेळाडूंची गरज आहे. मुंबई इंडियन्सला ३, तर चेन्नई सुपर किंग्जला २ परदेशी खेळाडूंची गरज आहे. लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने ७ खेळाडूंना सोडले, तर मुंबई इंडियन्सने ९ खेळाडू सोडले आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडू मिळवण्यासाठी दोन्ही फ्रॅंचायजी आपली पूर्ण ताकद लावणार आहेत. यासाठी इंग्लंडचा सॅम करन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन यांची नावे समोर येत आहेत. सॅम करण आणि कॅमेरून ग्रीन या दोन्ही खेळाडूंमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करण्याची ताकद आहे.

सॅम करणने २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले असून टी २० विश्वचषकाचा फायनलमध्येही सामनावीराचा बहुमान मिळाला आहे. तर टी २० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना कॅमरून ग्रीनची सर्वोत्तम कामगिरी भारतीय खेळपट्ट्यांवर पाहायला मिळाली. तीन टी २० मालिकेतील दोन सामन्यांत त्याने अर्धशतकी खेळ केला. ज्यामध्ये ३९.३३ सरासरीने ११८ धावांचा पल्ला त्याने गाठला याशिवाय गोलंदाजीतही त्यांनी कामगिरी केली आहे. आणि आता हे दोन्ही खेळाडू लिलावात सहभागी झाले असून, २ कोटी ही त्यांची मूळ किंमत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा