पुणे २६ जुलै २०२२ : तंत्रज्ञानाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा दिवस मानला जाणार आहे. आज जगातल्या प्रगतशील आणि आवश्यक अशा 5G तंत्रज्ञानाचा लिलाव होणार आहे. एकुण 72 GHZ 5G स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा हा लिलाव असणार आहे. 5G लिलाव प्रक्रिया दोन दिवस चालेल आणि स्पेक्ट्रमची विक्री राखीव किमतीच्या आसपास होईल, अशी उद्योगांना अपेक्षा आहे. एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5G सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
रिलायन्स जीओ- १४,००० करोड, तर त्यांच्या तुलनेत भारती एअरटेल- ५५०० करोड, व्होडाफोन- २२०० करोड, आणि अदानी ग्रुपकडून १०० करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून दूरसंचार विभागाला ७०,००० कोटी ते १००००० कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा लिलाव हा भारताचे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले हे पुढचे पाऊल म्हणावे लागेलं.
सध्या 5G हे शब्द सगळ्यांनाच बहुचर्चित आहे. पण हे 5G म्हणजे नक्की काय, त्याचे उपयोग काय आणि त्याचे भारतात कधी आगमन होणार, या सगळ्या प्रश्नांना अनुसरुन न्यूज अनकट ने घेतलेला आढावा…
5G म्हणजे नक्की काय?
5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). अतिशय वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा म्हणजे 5G. मोबाईल इंडस्ट्री इंटरनेटच्या माध्यमातून नेटवर्क तयार करते. त्यानंतर ते नेटवर्क रिबील्ड होतं. त्यालाच आपण नेक्स्ट जनरेशन अर्थात ‘G’ असं म्हणतो. सध्या मोबाईल कंपन्या 4G LTE नेटवर्कचा वापर करत आहेत. ही सेवा जलद असली तरी यामुळे युजर्सला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे 5G सेवा आल्यानंतर इंटरनेट सेवा जलद होईल. त्याचबरोबर 4 जी सेवेनुसार सध्या १००० Mbps इंटरनेटचा सरासरी स्पीड आहे. मात्र, 5G सेवा अपडेट झाल्यानंतर प्रत्येकाला प्रति सेकंदाला १०,००० Mbps इतका स्पीड मिळेल. 5G हे पाचव्या पिढीचे सेल्युलर तंत्रज्ञान आहे, जे मोबाइल नेटवर्कवर डाउनलोड आणि अपलोडिंगचा वेग वाढवेल.
तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये?
• 5G हे ९९ टक्क्यापर्यंत उर्जा बचत करण्यास सक्षम असलेलं प्रगत तंत्रज्ञान म्हणावे लागेलं.
• 10Gbps Data Rate सुविधा प्रदान करेल.
• त्याची विलंबता 1ms असेल.
• शंभर टक्के कव्हरेज देणारं योग्य तंत्रत्रान असेल.
• १०००x Per Unit Area तिची Bandwidth असेल.
• कोणत्याही भौगोलिक प्रदेशात Network Speed आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
• कमी बॅटरी वापरेल.
5G सेवेचा उपयोग काय?
• मोबाइल नेटवर्कवर डाउनलोड आणि अपलोडिंगचा वेग वाढवेल.
• जास्त जलद नेट स्पीड, अधिक फ्लेक्सिबिलिटी अर्थात लवचिकपणा.
• थेट क्लाउडशी कनेक्ट होणार.
• मशीन-टू-मशीन संवादामध्ये आणखी सुधारणा होणार.
ट्रायल्ससाठी 6 महिने
सध्या 5G या ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परवानगीमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल.
देशात 5 जी कधी सुरु होईल?
टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पुढील 6-8 महिन्यांमध्ये भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते. कारण अनेक कंपन्या या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 लाँच करण्याच्या तयारीत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते डोमेस्टिक टेलिकॉम मार्केट 5G सेवांसाठी तयार होण्यास कमीत कमी 2 वर्ष लागू शकतात.
जिओचं स्वतःचं नेटवर्क
रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5G नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल. त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल. एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (3.2 गीगाहर्ट्ज ते 3.67 गीगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (24.25 गीगाहर्ट्ज ते 28.5 गीगाहर्ट्ज) आणि सब-गीगाहर्ट्ज बँड (700 गीगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5 जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली आहे.
पहिला 5G स्मार्टफोन
वनप्लस, शाओमी आणि हुवावे या मोबाईल कंपन्या पहिला 5G स्मार्टफोन लाँच करतील. अशा प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान भारतात आल्यानंतर भारत नक्कीच तंत्रज्ञानात अग्रेसर होईल. त्यामुळे या लिलावात काय निर्णय लागतो, हे पहाणं औत्युक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस