ऑगस्टा वेस्टलँडशी संबंधित कंपनीवरील बंदी उठवल्यावर काँग्रेसने विचारले – मोदी सरकारची ही ‘गुप्त डील’ होती का?

12

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२१ : ऑगस्टा वेस्टलँडशी संबंधित लिओनार्डो एसपीए/Leonardo SpA या इटालियन कंपनीवरील बंदी उठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदी नुकतेच रोमला गेले होते, तेथे त्यांनी G-20 शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि या बैठकीत ऑगस्टा/फिनमेकॅनिका या विषयावर चर्चा झाली. त्यानंतरच ही बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने लिओनार्डो एसपीए’वरील बंदी उठवली, जी पूर्वी फिनमेकॅनिका (अगस्टा वेस्टलँडची मूळ कंपनी) म्हणून ओळखली जात होती. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मधून रहस्यमयपणे काढून टाकले आहे. मोदी सरकारने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून ऑगस्टा वेस्टलँडच्या गुंतवणुकीलाही मान्यता दिली असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच नौदलासाठी १०० हेलिकॉप्टर खरेदीसाठी सरकारने ऑगस्टा या कंपनीलाही बोली लावण्याची परवानगी दिली आहे. वल्लभ म्हणाले की, मोदी सरकार हे षडयंत्र खोट्याच्या आधाराने लपवत आहे.

ते म्हणाले की, फेब्रुवारी २०१० मध्ये यूपीए सरकारने १२ हेलिकॉप्टर खरेदीसाठी ऑगस्टा वेस्टलँडसोबत २,५२६ कोटी रुपयांचा करार केला होता. फेब्रुवारी २०१३ मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी सांगितले की तोपर्यंत ऑगस्टा वेस्टलँडला १,६२० कोटी रुपये दिले गेले होते आणि ३ हेलिकॉप्टर आधीच आली होती. पण नंतर सरकारने हा करार रद्द केला आणि ऑगस्टाविरुद्ध इटलीमध्येही गुन्हा दाखल केला. यूपीए सरकारने १,६२० कोटी रुपयांऐवजी २,०६८ कोटी रुपये वसूल केल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच ८८६.५० कोटी रुपयांची तीन हेलिकॉप्टरही जप्त करण्यात आली आहेत.

ते म्हणाले की, १५ फेब्रुवारी २०१३ रोजी यूपीए सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण जुलै २०१४ मध्ये मोदी सरकारने काळ्या यादीतून काढून टाकण्याचे आदेश दिले.

काँग्रेसने विचारले पाच प्रश्न

१. मोदी सरकार आणि Agusta/Finmecanica यांच्यातील ‘गुप्त करार’ काय आहे?
२. मोदी आणि त्यांच्या सरकारला आता ‘भ्रष्ट आणि बनावट कंपनी’शी व्यवहार करणे योग्य वाटते का?
३. याचा अर्थ २०१९ च्या निवडणुकीपूर्वी निर्माण झालेली भ्रष्टाचाराची बोगस दलदल 2G स्पेक्ट्रम वाटपाप्रमाणे मूकपणे गाडली जात आहे का?
४. काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या ऑगस्टाविरोधातील तपासाचे काय होणार?
५. ऑगस्टा/फिनमेकॅनिका विरुद्ध प्रलंबित लवादाचे काय होईल? यामुळे महसूल बुडणार का? कारण यूपीए सरकारने १,६२० कोटी रुपयांऐवजी २,९५४ कोटी रुपये (२०६८ +८८६.५०) वसूल केले होते.

योगीजींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही

गौरव वल्लभ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समाचार घेतला आणि सांगितले की, त्यांना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही. ते म्हणाले की, तुम्ही पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी यांना गंगेत डुबकी मारताना पाहिले नाही, नाही तर मी फोटो पाठवतो. ते म्हणाले की, मी योगी नाही पण योगीजींना धर्म आणि वेदांवर वादविवाद करण्याचे आव्हान देतो. ऑक्सिजनअभावी लोक मरत असताना तुम्ही कुठे होता, असे ते म्हणाले. वल्लभ म्हणाले की, हनुमानजींची जात सांगण्याचे पाप तुम्ही केले, मग तुम्ही लोकांचे प्राण वाचवू शकले नाही, त्यांना वैद्यकीय सुविधा देऊ शकले नाही.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे