मुंबई, दि. १८ जुलै २०२० : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केली.मुख्यमंत्री दूध प्या, दुधाला भाव द्या’ असे हे अभिनव आंदोलन राहणार असून आंदोलनात रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे मित्र पक्षही सहभागी होणार असल्याचे डॉ.बोंडे यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली असून दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. राज्यात दररोज १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन होते.
लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय जिथे दुग्धजन्य पदार्थांची गरज असते ते बंद आहेत परिणामी २० मार्चपासून पिशवी बंद दुधाचा खप ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री १०% ते १५% पर्यंत घटली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.