औरंगाबाद हादरलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

औरंगाबाद, २२ डिसेंबर २०२२ : औरंगाबाद शहरात एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरलं आहे. वाळूज औद्योगिकनगरीत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

पहिल्या घटनेत शाळेतून ढाब्यावर नेत दहावीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी एकटी असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला घरातून कपाशीच्या शेतात ओढत नेत बलात्कार करण्यात आला. दोन्ही घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वाळूज औद्योगिकनगरीतील शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटारसायकलवर बसवून खुलताबाद येथील ढाब्यावर नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही आरोपीने तीन ते चारवेळा ढाब्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन पाणी पिण्याचा बहाना करीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला; तसेच घडलेल्या घटनेप्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. रमेश येडुबा मोरे असे नराधमाचे नाव असून दोघांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

घडलेल्या या घटनेमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, मागील तीन दिवसांत बलात्काराच्या दोन घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा