पुणे, २३ मार्च २०२३: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. विजयाने सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माच्या संघाने शेवटचे दोन सामने गमावल्यामुळे मालिकाही हातातून गेली, विश्वचषकापूर्वी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, मात्र या पराभवामुळे टीम इंडिया आणि वर्ल्डकपच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चेन्नईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २७० धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २१ धावांनी पराभव केला, यासह ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ ४८ षटकांत सर्वबाद २६९ धावांवर आटोपला. भारतीय संघ ४९.१ षटकात २४८ धावांवर सर्वबाद झाला.
मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. यानंतर विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली, याच कारणामुळे तिसरा सामना निर्णायक ठरला ज्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर-१ संघ बनला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड