पुणे, १० सप्टेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आरोन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उद्या रविवारी आपल्या कारकिर्दीतील तो शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. फिंच गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तो न्यूझीलंडविरुद्ध १४६ वा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळणार आहे.
ऑस्टेलियाचा कर्णधार आरोन फिंच ३६ वर्षाचा आहे. अचानक क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत १४५ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५४०१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची धडाकेबाज फलंदाजी असल्यामुळे त्याने आत्तापर्यंत १७ शतके झळकावली आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी आरोन फिंचने निवृत्तीचे संकेत दिले होते. आरोन फिंचने आपल्या कारकिर्दीत ५ कसोटी सामने खेळले आहेत, अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून (Australia) १४५ वनडे आणि ९२ टी-२० सामने खेळले आहेत.
आरोन फिंच सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. फिंचची टी-२० मधील कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे. त्याने ९२टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५.२४ च्या सरासरीने २८५५ धावा केल्या आहेत. या ६५ सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले आहे. सर्वाधिक T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय T२० मध्ये सर्वात जलद २५०० धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७२ धावांची इनिंग खेळली आहे. टी-२०मध्ये कर्णधाराने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. ऑस्ट्रेलियासाठी टी२० विश्वचषक जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव