पुण्यामधील महाज्योती संस्थेची स्वायत्तता धोक्यात; प्रा. दिवाकर गमेंचा आंदोलनाचा इशारा

पुणे, १ एप्रिल २०२३: माहात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती संस्थेच्या वतीने ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु, राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महाज्योती संस्थेची अडवणूक करण्यात येतेय. त्यामुळं संस्थेची स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप करत संस्थेचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील आठ कोटी ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीने मागील अडीच वर्षांच्या काळात मोफत प्रशिक्षण तसेच स्टायपेंड आणि फेलोशिप देणारे विविध प्रशिक्षण सुरू केलं. आतापर्यंत महाज्योतीने ४८ हजार विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणाचा लाभ दिलाय.

तत्कालीन ओबीसी मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महाज्योतीला संपूर्ण स्वायत्तता दिल्यामुळंच हे शक्य झालं. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारने महाज्योतीवरील अशासकीय संचालकांच्या नेमणुका रद्द केल्या. स्वायत्त असलेल्या महाज्योती संस्थेत मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अवाजावी हस्तक्षेप सुरू होऊन तिची स्वायत्तता धोक्यात आलीय.

त्यामुळं शासनाने नियमबाह्य आक्षेप तत्काळ मागं घ्यावेत. तसेच २० एप्रिलपर्यंत पीएचडी धारक विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांची सहा महिन्यांची प्रलंबित फेलोशिप जमा करावी. अन्यथा महाज्योती शासनाच्या विरोधात नागपूरला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिवाकर गमे यांनी दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा