हवेलीकरांना आता घरबसल्या मिळणार डिजिटल स्वाक्षरीचे दाखले! तहसीलदारांची मोठी घोषणा!

19
Available online with digital signature
आता घरबसल्या डाउनलोड करा डिजिटल स्वाक्षरी

Available online with digital signature:हवेली तालुक्यातील नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे! आता तुम्हाला विविध शासकीय कामांसाठी तलाठी आणि तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. कारण, हवेलीतील तब्बल १० गावांमधील महत्वाचे सहा दाखले आता डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत! यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

आता घरबसल्या डाउनलोड करा डिजिटल स्वाक्षरी

हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले,आम्ही तालुक्यातील सुमारे २४ लाख दाखले स्कॅन केले आहेत. यापैकी १० गावांमधील दाखल्यांवर डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते आता नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या डिजिटल स्वाक्षरीमुळे या दाखल्यांना शासकीय मान्यता प्राप्त झाली असून, ते आता घरबसल्या डाउनलोड करता येणार आहेत.

यापूर्वी दाखले ऑनलाइन उपलब्ध असले तरी त्यावर तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारांची प्रत्यक्ष स्वाक्षरी नसायची. त्यामुळे नागरिकांना डाउनलोड केलेले दाखले घेऊन पुन्हा कार्यालयात जावे लागत होते. मात्र, आता डिजिटल स्वाक्षरीमुळे ही अडचण दूर झाली आहे.

सुरवसे यांनी पुढे माहिती दिली की, उर्वरित गावांमधील ऑनलाइन दाखल्यांवर डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम वेगाने सुरू आहे आणि ते पुढील महिनाभरात पूर्ण होईल. म्हणजेच, लवकरच संपूर्ण हवेली तालुक्यातील नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर नेण्याचे ठरवले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील सुमारे ३ कोटी १० लाख कागदपत्रे पुढील वर्षभरात ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या घोषणेमुळे हवेली तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता जन्म-मृत्यू दाखला, फेरफार आणि सातबारा उताऱ्यासह एकूण सहा महत्वाचे दाखले घरबसल्या मिळवणे शक्य होणार आहे. सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक गर्दी कमी होणार असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. हवेली तहसीलदारांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे, यात शंका नाही!

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे