आव्हाळवाडी, दि.१३ ऑगस्ट २०२०: आव्हाळवाडी – मांजरी शिवेवर असणाऱ्या मनकाई नगर परिसरामध्ये रस्त्याच्या जवळ बसलेला एक वयस्क बिबट्या कॅमेर्यात कैद झाला असून बिबट्याचा स्पष्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने दोन्ही गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाच्या वतीने परिसरात पाहणी करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आव्हाळवाडी मांजरी परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. अनेकवेळा बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. आव्हाळवाडी मांजरी शिवेवरील मनकाई नगर परिसरामध्ये तरुण चार चाकीत जात असताना रस्त्याच्या जवळ बसलेला बिबट्या त्यांना दिसला व त्याच्या दिशेने गाडीची लाईट गेली असता तो शेताच्या दिशेने पसार झाला. सदरचा प्रकार तरुणांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
येथून जवळ असणाऱ्या शेतात व परिसरामध्ये बिबट्याचे ठसे देखील मिळाले आहेत. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत वन विभागाला कळविले असता परिसराची पाहणी केली असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील परिस्थिती पाहून कार्यवाही करण्यात येणार आहे.
व्हिडिओमध्ये कैद झालेला बिबट्या मादी आहे. पोटाचा वाढलेला आकार पाहता तिच्या पोटामध्ये पिल्ले असण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे वनरक्षक बी. एस. वायकर यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे