इंदापूर, दि. २६ जून २०२० : शेतकऱ्यांना सावकराच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांसाठी ‘किसान क्रेडीट कार्ड’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र बँका हे कार्ड देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे चित्र सबंध इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना हे कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सुविधांपासून शेतकरी वंचीत राहत आहेत. हे कार्ड मिळावे म्हणून काही शेतकरी बँकांकडे हेलपाटे मारत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची योजना जाहीर केली होती. यामध्ये तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे. मात्र, अनेक राष्ट्रीयकृत बँका हे कार्ड देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी किसान क्रेडीट कार्ड मिळावे यासाठी बँकाकडे हेलपाटे मारत आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक कामावर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम बँकेच्या कामकाजावरही झाला आह, काही बँका कोरोनामुळे कार्ड देण्यासाठी अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत.
सध्या मान्सूनपूर्व पेरणी हंगाम सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पळापळ सुरू आहे. यातच बँकांच्या आडमुठी धोरणामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे.
याबाबत काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी याविषयी बोलणे टाळले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे