धर्मेंद्रसिंह भदौरिया अयोध्या – राम जन्मभूमी, हनुमान गढी, भरत निवास, सीता राजमहाल यांसारखी प्रमुख मंदिरे असलेल्या रामकोट या मोहल्ल्यात प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे. प्रत्येक गल्लीच्या टोकाला बॅरिकेड्स लागले आहेत आणि मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात आहे. श्रीसीता राजमहाल मंदिराचे मुख्य महंत श्यामबिहारी दास आपली रिकामी धर्मशाळा आणि रेस्टॉरंट दाखवत सांगतात की, लवकर निकाल आल्यास येथे वर्दळ वाढेल. पण, सध्या तरी आपले भाविक आणि येथे येणारे लोक त्रस्त आहेत.
अयोध्येच्या कारसेवकपूरममध्ये ठेवलेले मंदिराचे मॉडेल पाहण्यास येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. येथे ठेवलेली राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यास येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही प्रतिकृती २१ फूट लांब, ११ फूट रुंद आणि ९ फूट उंच आहे. विश्व हिंदू परिषदेची अयोध्येच्या याच प्रतिकृतीच्या आधारावर भव्य राम मंदिर बांधकामाची योजना आहे. विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की, आधी कारसेवकपूरममध्ये दररोज सरासरी ४०० लोक येत होते, पण गेल्या एक महिन्यापासून ही सरासरी ६०० पेक्षा जास्त झाली आहे. आधी कार्यशाळेत खांब-शिळांसोबत ठेवलेली लहान प्रतिकृती पाहूनच लोक निघून जात होते, पण ते येथपर्यंतही येतात. शर्मा म्हणाले की, सुनावणी पूर्ण होत आहे, लोकांना वाटते की निकाल मंदिराच्या बाजूने लागेल. त्यामुळे खरे मंदिर कसे असेल, हे पाहण्याची लोकांची इच्छा आहे. अशाच येणाऱ्या लोकांत हाथरस जिल्ह्यातील शादाबादचे ७१ वर्षीय गजराज सिंह परमार यांचाही समावेश आहे. परमार राम मंदिराची प्रतिकृती न्याहाळतात. त्याच्या टोकांना श्रद्धेने स्पर्श करतात आणि डोके टेकवतात. पहिल्यांदाच आलेले परमार म्हणाले की, मंदिर तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तयार होईल, पण तोपर्यंत हीच प्रतिकृती पाहून घेऊ कारण आता पुन्हा येऊ शकू की नाही, असे वाटते. अयोध्येत सध्या प्रत्येक प्रमुख बाजार, मंदिर, मठ आणि घरांत चर्चेचे दोनच विषय आहेत. पहिला, आगामी दिवाळीत ठेवल्या जाणाऱ्या दिव्यांची संख्या आणि तयारी. दुसरा, सर्वोच्च न्यायालयात १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणारी सुनावणी आणि निकालाचे पूर्वानुमान. मंदिर प्रकरणाशी संबंधित महंत आणि हिंदू पक्षाच्या लोकांना वाटते की, सर्वोच्च न्यायालय त्यांनी दिलेल्या अकाट्य तथ्यांच्या आधारावर मंदिराच्या बाजूने निकाल देईल. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाचे लोक म्हणतात की, सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल, पण आता निकाल लवकर यावा. अयोध्येच्या वासुदेव घाटावर राहणारे रमेंद्र मोहन मिश्रा म्हणाले की, लवकरच न्यायालय अंतिम निकाल देईल आणि अयोध्येचा ७० वर्षे जुना वाद संपेल हे ऐकून चांगले वाटत आहे. भव्य मंदिर निर्मिती झाल्यास अयोध्येतील हजारो लोकांना रोजगार मिळेल. न्यायालयातील मुख्य पक्षकार श्रीरामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात हिंदू पक्षातर्फे अकाट्य तथ्य आणि पुरावे दिले आहेत.
सुरक्षा दिवसेंदिवस कडक
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना आणि निकालाची संभाव्य तारीख जवळ आली असताना सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे. वादग्रस्त परिसरासोबतच शहराच्या प्रमुख गल्ल्यांत सुरक्षा जवान दिसत आहेत. संवेदनशील ठिकाणी वाहनांसाठीही पिवळे कार्ड जारी होत आहेत. जिल्हा प्रशासनानुसार, लवकरच राज्य पोलिस आणि केंद्रीय दलांचे जवान मोठ्या संख्येने तैनात केले जातील. ही संख्या १० हजारांपेक्षा जास्त असू शकते. अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांनी सांगितले की, आम्ही संख्या तर सांगू शकत नाही, पण अलीकडेच सुरक्षा वाढली आहे आणि ती आणखी वाढवली जाईल.