भडकाऊ भाषण केल्याने आझम खान यांची आमदारकी रद्द

नवी दिल्ली, २९ ऑक्टोंबर २०२२ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व आता रद्द करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे विधानसभा मतदारसंघातील रामपूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. नुकतेच त्यांना भडकावू भाषण दिल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यासोबतच ६ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये आझम खान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा युतीचे उमेदवार होते. एप्रिल २०१९ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मिलक कोतवाली भागातील खतनगरिया गावात जाहीर सभा घेतली होती.

त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी अंजनेय कुमार सिंह यांच्याबद्दल असभ्य भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनतर भडकावू भाषण केल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांच्यावर आयपीसीच्या कलम १५३ए, ५०५ए आणि १२५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, आणि त्यांना ३ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रक्षोभक भाषण करून आझम खान चर्चेत आले होते.
त्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आमदारकीही रद्द

आझम खान यांच्या शिक्षेस न्यायालयाने जामीन दिला असला तरी आता त्यांना विधानसभेतूनही मोठा धक्का देण्यात आला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. सभापती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे आझम खान यांचं विधानसभेचं सदस्यत्वही रद्द झालं आहे. ते रामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. फिर्यादी पक्षाचे वकील आणि प्रभारी सहसंचालक शिव प्रकाश पांडे यांनी वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ७ एप्रिल २०१९ रोजी घडलं असून त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. या प्रकरणात ते दोषी आढळलेत आणि त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा