पुणे, १० मार्च २०२३ : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी हातमिळवणी करीत चार वर्षांचा बी.एस्सी. ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात वर्ष २०१८ पासून मेलबर्न विद्यापीठासोबत करार करीत तीन वर्षांचा बी.एस्सी. ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू होता. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता तो चार वर्षांचा करण्यात आला असून, चारपैकी दोन वर्षे विद्यार्थ्यांना मेलबर्न विद्यापीठात पदवी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या चारवर्षीय बी.एस्सी. ब्लेंडेड पदवी अभ्यासक्रमाची घोषणा ९ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे ऑस्ट्रेलियन ट्रेड ॲण्ड टुरिझम मंत्री डॉन फरेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मेलबर्न विद्यापीठाने भारतातील तीन विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मद्रास विद्यापीठ, गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट, तर महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, विद्यापीठाच्या ‘इंटरडिसिप्लीनरी स्कूल ऑफ सायन्सेस’चे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार; तसेच मेलबर्न विद्यापीठाचे कुलगरू डॉ. डंकन मास्केल, मद्रास विद्यापीठाचे कुलगरू डॉ. एस. गोवरी, तर गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंटचे प्रा. दयानंद सिद्दावतम आदी मान्यवर उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर