आज २६ डिसेंबर मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा इ.स. १९१४ रोजी जन्म झाला. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
जीवन प्रवास……
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात २६डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली.
पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
अभय साधक……
१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.
कार्य…..
इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.
आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)
अशोकवन – नागपूर
लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा
बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत.
फेब्रुवारी ९, इ.स. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव











































