बाबासाहेब भोस यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा, दि. २४ मे २०२०: श्रीगोंदा शहरात २० मे रोजी हॉटेल सिध्दी जवळ आणि हॉटेल सृष्टीच्या पाठीमागे जुगार खेळणार्‍या इसमांच्या विरोधात कारवाई केल्याचा राग आल्याने पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या विरूध्द फोन वरून अरेरावी व अश्लील भाषा वापरल्याने व पोलीस प्रशासनावर दडपशाही करण्याचा प्रयत्न तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २० मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि श्रीगोंदा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने श्रीगोंदा शहरातील हॉटेल सिध्दी जवळ आणि हॉटेल सृष्टीच्या पाठीमागील बाजुस भिंतीच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा हार जितचा जुगार पैशावर खेळत असताना त्यांना जागेवर रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावेळी जुगार खेळणार्‍या इसमांकडून ४० हजार ३०० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन असे जप्त केले.

या कारवाईचा हॉटेल सृष्टीच्या मंगेश गांजुरे याला राग आल्याने त्याने तुम्हाला पाहुन घेतो, तुमचे विरुध्द खोटे नाटे अर्ज करुन तुम्हाला गुंतवितो, असे बोलल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दि २२ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी पो.नि. संदीप पितळे यांच्याशी फोनवरून धमकी वजा संभाषण करून श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्याबद्दल अरेरावी तसेच अश्लील भाषा वापरून पोलीस प्रशासनावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बाबासाहेब भोस यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पो. नि. संदीप पितळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा