पुणे, १७ मार्च २०२३: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली. वेल्हे तालुक्यात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. आंब्याचा मोहोर, गहू, कांदा, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. तर वीटभट्टी धारकांना देखील पावसाचा मोठा फटका बसलाय.
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारी अचानक अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळीवाऱ्यासह, गारांसह पावसाने सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी व वाहनचालकांची धांदल उडाली. कसेतरी करुन आपलं घर किंवा सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी गडबड झाली होती.
परिसरात जवळपास चार ते पाच तास पावसाने हजेरी लावली. पावसामुळं गहू, कांदा, आंबा, आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आंबा मोहोर व काही प्रमाणात आंब्याच्या कैरीही गळून पडल्या आहेत. तसेच जनावरांसाठी गोळा केलेला चारा पूर्णपणे भिजून गेलाय. तर वीटभट्टी धारकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिणामी बळीराजा अडचणीत सापडलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर