निसर्गरम्य बैसरण घाटी, असुरक्षित वाटा! पर्यटकांच्या जीवाशी खेळ?

9
Unsafe conditions at Baisaran Valley after Pahalgam Attack.
बैसरण घाटी, असुरक्षित वाटा!

Unsafe conditions at Baisaran Valley after Pahalgam Attack: स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आकुर्डीतील बशीर सुतार यांनी बैसरण घाटीतील धक्कादायक अनुभव कथन केला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, या सुंदर पर्यटनस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. बैसरण घाटीचा निसर्गरम्य रस्ता अत्यंत बिकट आणि किचकट असूनही, येथे एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे सुतार यांनी सांगितले. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सुतार आणि त्यांची पत्नी १५ एप्रिल रोजी काश्मीरला पर्यटनासाठी आले होते. लेह-लडाखच्या मार्गावर असताना पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी कळताच त्यांनी पुढील बेत रद्द केला आणि ते श्रीनगरला परतले. सोमवारी सुतार कुटुंब बैसरण घाटीला भेट देऊन आले होते. “जिथे हल्ला झाला, त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही तिथे फिरलो होतो. तो रस्ता खूप अरुंद आहे आणि घोड्याशिवाय तिथे जाता येत नाही. कमीतकमी एक ते दीड तास लागतात,” असे त्यांनी सांगितले.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटामुळे प्रसिद्ध घाटी, पण सुरक्षा शून्य;

विशेष म्हणजे, प्रसिद्ध ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीचे घर याच घाटीत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण परिसरात एकही सुरक्षा रक्षक त्यांना दिसला नाही. मुख्य रस्त्यावर केवळ सुरक्षा दलाचे सैनिक तैनात होते. घाटीचा बिकट आणि किचकट रस्ता पाहता, दहशतवाद्यांनी याच ठिकाणाची निवड केली असावी, असा अंदाज सुतार यांनी व्यक्त केला आहे.

या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सुतार म्हणाले, “जेव्हा देशाचे गृहमंत्री येथे आले होते, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व सुरक्षा दल हजर होते. मात्र, सामान्य पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, याचे खूप दुःख वाटते. पर्यटकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील रोजगारावरही मोठा परिणाम झाला आहे. येथील घोडेवाले, हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि शिकारा चालवणारे यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आज श्रीनगरच्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले शहर आता भकास दिसत आहे. सरकारने कठोर पाऊले उचलून परिस्थिती पूर्ववत करावी, अशी अपेक्षा सुतार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली २८ एप्रिलची श्रीनगर ते मुंबई विमान तिकीट रद्द करून २४ एप्रिलचे नवीन तिकीट आरक्षित केले आहे, यावरून तेथील भयावह परिस्थितीची कल्पना येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे