बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ – ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
बालपण
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.
प्लेगविरोधी फवारणीस विरोध
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :”रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.”
टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.
न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी
त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.
दुष्काळ
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या ‘Famine Relief Code’ नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना ‘Famine Relief Code’ बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.
जहालवाद विरुद्ध मवाळवाद
तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.
लाल-बाल-पाल
लाल बाल पाल
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा
८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.
पत्रकारिता
केसरीतील अग्रलेख
चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठा चे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ‘ केसरी ‘ चे संपादकपद तर टिळकांकडे ‘ मराठा ‘ या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ‘केसरी’ त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ‘ केसरी ‘ चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ‘ केसरी ‘ चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘, ‘ उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘ टिळक सुटले पुढे काय ‘, ‘ प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ‘, ‘ टोणग्याचे आचळ ‘, ‘हे आमचे गुरूच नव्हेत ’, ‘ बादशहाब्राह्मण झाले ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.
साहित्य आणि संशोधन
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत :-
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नीचा देहान्त झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.
प्रसिद्ध घोषणा/वचने
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.