बालदिन विशेष
दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन साजरा केला जातो. याच दिवशी १८८९ मध्ये भारताचे सर्वात प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील पंडित जवाहरलाल नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
१९५४ साली संयुक्त राष्ट्राने २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली होती. असे असले तरीही, जगातील विविध देशांमध्ये विविध तारखांना बालदिन पार पडतो. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
नेहरूंना सुरुवातीपासूनच लहान मुलांच्या प्रति विशेष जिव्हाळा होता. ही बाब लक्षात घेता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना आदरांजली देण्याच्या हेतूने भारत सरकारकडून हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. २७ मे १९६४ साली सर्वांनुमताने हा दिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला.
आपण वर्षानुवर्षे बाल दिन साजरा करत आलो आहोत. पण आज त्या बालकांचे भवितव्य खरेच तेवढे सुरक्षित आहे का? समाजामध्ये बालदिनानिमित्त अनेक लोक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. परंतु संपूर्ण वर्ष देशभरात जे बालकांसोबत घडत असतं तेव्हा सर्व शांत असतात. एखादा दिवस साजरा करणे हे आजकाल सेलिब्रेशनपेक्षा अधिक काही राहिले नाही.
बाल कुपोषणामुळे देशात बालकांच्या मरण्याच्या संख्येकडे वर्षभर कोणाचे लक्ष नसते. परिस्थितीमुळे अनेक मुले शाळेचे तोंडही बघू शकत नाही. दोन वेळा पोटाचे खळगे भारत यावे म्हणून बालमजुरी करावी लागते. सरकार जरी बालमजुरी बंद करत असले तरी मजुरी बंद झाल्यावर त्याच्या पोटाच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिले आहे का? खरं बालदिन त्या दिवशी असेल जेव्हा देशातील प्रत्येक मूल शाळेत असेल.
प्रत्येक बालकाला पूर्ण आहार मिळेल. देशाचे भवितव्य असणाऱ्या या चिमुकल्याचे भवितव्य सुरक्षित असेल तेव्हा हा बाल दोन खऱ्या अर्थाने असेल.
Very true