Bhegade assures support to Maharashtra poultry farmers: राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या शिष्टमंडळाने भेगडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. भेगडे यांच्या या आश्वासनामुळे पोल्ट्री व्यावसायिक (Poultry farmers) वर्गात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
या बैठकीत माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलासराव साळवी, संघटक सोनबा गोपाळे, तालुकाध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष संतोष घारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्यांचा पाढा;

पोल्ट्री व्यावसायिकांनी शासनाकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. यामध्ये पोल्ट्री व्यवसायाचा समावेश शेती व्यवसायात करणे, शेडवरील घरपट्टी माफ करणे, शेतीपंपाप्रमाणे विजेची आकारणी (Electricity charges for poultry) करणे आणि अनुदान तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प (Solar energy project for poultry) उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने लागू केलेली पोल्ट्री व्यवसायासाठीची नियमावली राज्यात तातडीने अंमलात आणावी, अशीही मागणी संघटनेने पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे यांच्या भेटीदरम्यान केली आहे.
भेगडे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































