रवींद्र जाडेजाकडून बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर

11

गुजरात, १ डिसेंबर २०२२ आज गुजरात निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानापूर्वी क्रिकेटर रवींद्र जाडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना ‘अजूनही वेळ आहे, समजून घ्या गुजरातींनो’ असे कॅप्शन जाडेजाने लिहिले आहे.

नेमके काय म्हणाले होते बाळासाहेब ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडीओमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर भाष्य केले आहे. “माझं हेच म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केलेत तर तुमचे गुजरात गेले. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे”, असे म्हटले आहे.

रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. तर रवींद्र जाडेजाची मोठी बहिण मात्र काँग्रेसचा प्रचार करताना दिसते आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा आपल्या पत्नीच्या बाजूने तर त्याचे वडिल आपल्या मुलीच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे.

जाडेजाच्या या ट्वीटनंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही निवडणूक केवळ पंतप्रधान मोदींचा हवाला देऊन लढवली जात आहे का? असेही प्रश्न सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या ८९ जागा राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या असून या टप्प्यात एकूण ७८८ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.