पुणेकरांचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरील छताचे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) कोसळले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, या ठिकाणी कोणतेही प्रदर्शन किंवा कार्यक्रम नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे रंगमंदिराच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.
या नाट्यगृहातील सोयीसुविधांबाबत अनेकदा तक्रारी होत असल्या तरी, तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जाते, असा आरोप होत आहे. सध्या कोसळलेल्या पीओपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पुणेकरांमध्ये प्रशासनावर संतापाची लाट पसरली आहे. बालगंधर्व रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तू जुनी झाल्यामुळे ही घटना घडली असावी. या घटनेनंतर महापालिकेच्या भवन विभागाने पाहणी केली असून, दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाईल असे अपेक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































