नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ : अरविंद केजरीवाल सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संचालनालयाने (DE) गुरुवारी एक नियमावली जारी केलीय. जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा नियम केवळ सरकारी शाळांनाच नाही तर खासगी शाळांनाही लागू होणार आहे.
सरकारच्या ऍडव्हायजरी कमिटीने म्हटले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत मोबाईल फोन आणू नयेत याची खात्री करावी. मुलांनी शाळेत मोबाईल आणल्यास तो जप्त करून लॉकरमध्ये ठेवण्याची खात्री शाळा प्रशासनाने करावी आणि मोबाईल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी.
केजरीवाल सरकारचा सल्ला केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही लागू होतो. वर्ग खोल्या, क्रीडांगण, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन वापरणे टाळावे, असे शिक्षकांना सांगण्यात आले आहे. डीओईने सांगितले की विद्यार्थ्यांकडून जप्त केलेले मोबाईल फोन डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांना परत केले जावेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड