केरळच्या मंदिरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रम आयोजनावर बंदी, मंदिरांमध्ये आता राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

तिरुवनंतपुरम २४ मे २०२३: केरळमधील मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (TDB) राज्यातील सर्व १२४८मंदिरांना परिपत्रके जारी केली आहेत. मंदिरांमध्ये केवळ धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कोणत्याही राजकीय कार्याला किंवा शाखेला कार्यक्रमासाठी परवानगी देऊ नये असे या परिपत्रका मध्ये सांगण्यात आले. या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. खरेतर मंडळाने या आधीही ३० मार्च २०२१ रोजी परिपत्रके जारी केली होती, ज्यात RSS शाखा, शस्त्र प्रशिक्षण आणि मंदिर परिसरात सरावावर बंदी घालण्यात आली होती. आदेशानंतरही राज्यातील काही मंदिरांमध्ये आरएसएसचे कार्यक्रम होत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्याने आता नव्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ आरएसएसच नाही, कोणत्याही संघटना किंवा राजकीय पक्षाला मंदिर परिसरात पूजाविधीशिवाय इतर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मंडळाच्या अधिकाऱ्यांना अशा उपक्रमांवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्यास आणि मुख्यालयाला अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यानंतरही मंदिरांमध्ये असे कार्यक्रम होत असतील तर सर्वसामान्यांनी मंडळाकडे तक्रार करावी असे म्हटले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनीही मंदिर परिसरात शाखांच्या शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रमांवरून वरून आरएसएसवर टीका केली. शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्मिक तेढ पसरवण्याचे काम करते. त्यामुळे मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची बंदी योग्यच आहे. मुख्यमंत्री पिनारई यांच्या या वक्तव्यावर भाजप केरळचे उपाध्यक्ष के एस राधाकृष्णन म्हणाले की, पिनारई यांना त्यांच्या कुटुंबीयांचे समाधान करायचे आहे. पिनारई हे त्यांचे जावई पीए मुहम्मद रियास यांच्या धार्मिक हिताचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे व्यवस्थापनही त्रावणकोर देवस्वम बोर्डाकडे आहे. त्रावणकोर देवस्वम बोर्डाची स्थापना १९५० मध्ये झाली. त्रावणकोर देवस्वम बोर्ड (TDB) केरळ राज्यातील १२४८ मंदिरांचे व्यवस्थापन करते. ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्याची स्थापना त्रावणकोर कोचीन हिंदू धार्मिक संस्था कायदा XV १९५० अंतर्गत करण्यात आली. प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील सर्व विधीही याच मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जातात. त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष सीपीएमचे ज्येष्ठ नेते के अनंतगोपन आहेत. केरळ व्यतिरिक्त, गुरुवायूर, मलबार, कोचीन आणि कूडलमनिक्यम बोर्ड आहेत. पाच मंडळे मिळून सुमारे ३००० मंदिरे सांभाळतात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा