बंधू सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय राऊत नाराज ?

मुंबई: बंधू सुनील राऊत यांना संजय राऊत नाराज झाले आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या ३१ डिसेंबर ला ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द करणार असल्याचेही बोललं जात आहे. सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत ते सातत्यानं आघाडीवर होते. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली असल्याचंही बोललं जातं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, शिवसेनेनं तीन अपक्षांना संधी दिल्यानं सुनील राऊत यांचं नाव मागे पडलं आहे. त्यावरून संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील प्रचंड नाराज आहेत. कारण गेल्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. पण यंदा तानाजी सावंताना स्थान देण्यात न आल्याने त्यांनी थेट मातोश्रीवरच ठाण मांडलं असल्याचं समजतं आहे. दरम्यान,  या सगळ्या नाराजांमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीलाच अशाप्रकारे नाराजी समोर आल्याने भविष्यात त्यांना मोठ्या आव्हानांना समोरं जावं लागणार आहे.

संजय राऊत यांनी फेटाळले नाराज असल्याचे वृत्त

खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र यावर बोलताना संजय राऊत यांनी असे सांगितले की, ‘सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली यातच समाधान आहे. कुठल्याही पदासाठी नाराज असण्याचं काहीही कारण नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत नाराज असल्याचे सगळीकडे बोलले जात असताना संजय राऊत यांनी यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत ही चर्चा फेटाळून लावली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा