गोल पोस्ट गुन्हा मालकाच्या तिजोरीवर नोकराचा डल्ला, वांद्रे पोलिसांकडून नोकराला बेड्या

मालकाच्या तिजोरीवर नोकराचा डल्ला, वांद्रे पोलिसांकडून नोकराला बेड्या

मुंबई, ११ जुलै २०२३ : नोकरानेच मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसात चोरीची घटना दाखल करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला ९० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जिवाजी पारूनाथ ठाणेकर वय ४३ वर्ष असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीने याआधीही असा गुन्हा केला आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

आरोपी जिवाजी ठाणेकर हा वांद्रे येथील फिर्यादी गेवन ऑब्रियो यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. मालकाची संपत्ती पाहून ठाणेकर याच्या डोक्यात उलटी चक्रे फिरली. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने मालकाच्याच तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने मालकाच्या तिजोरीतील सोन्याचे दागिने, अमेरीकन चलनातील एकूण ३८० डॉलर असा एकूण ३,९०,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.

तिजोरीतील मुद्देमाल चोरी झाल्याचे ऑब्रियो यांच्या लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेत नोकराविरोधात तक्रार दाखल केली.ऑब्रियो यांच्या फिर्यादीवरुन नोकराविरोधात कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपीचा कसून शोध घेत पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानकातून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version