मुंबई, २९ मे २०२३ : वांद्रे-वर्सोवा सी लिंक यापुढे वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने वांद्रे ते वर्सोवा दरम्यानच्या सी लिंक प्रकल्पाला वीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पुलाचे नाव बदलण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. २८ मे (रविवार) ही वीर सावरकरांची जयंती होती. या विशेष प्रसंगी, महाराष्ट्र सरकारने रविवारी वांद्रे-वर्सोवा लिंकचे नामांतर करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी स्वागत केले आहे.
महाराष्ट्र सरकारमध्ये वीर सावरकरांची विचारधारा खूप महत्त्वाची आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत होते. त्यानंतर त्यांनी वीर सावरकरांबाबत वक्तव्य केले मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींच्या या विधानाला कडाडून विरोध केला. त्यांनी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्राही काढली.
विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. ते वीर सावरकर म्हणून ओळखले जातात. वीर सावरकरांच्या विचारांना संघ आणि भाजप खूप महत्त्व देतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड