Sus garbage project protest Pune: बाणेर-सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्पाच्या सततच्या दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी (५ जून २०२५) सकाळी मानवी साखळी आंदोलन करत आपला तीव्र निषेध नोंदवला. सुस रोड बाणेर विकास मंचातर्फे आयोजित या शांततापूर्ण आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि परिसरातील अनेक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.
कचरा प्रकल्पामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. नीलिमा बुवा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “२०१६ पासून हा प्रकल्प सुरू झाल्यापासून दुर्गंधीमुळे सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. जर महापालिकेला हा प्रकल्प याच ठिकाणी चालवायचा असेल, तर किमान ५०० मीटरच्या बफर झोनमधील नागरिकांना योग्य भरपाई देऊन त्यांचे स्थलांतर करावे.” ईशान भोईटे यांनीही दुर्गंधीमुळे होणाऱ्या डोकेदुखी आणि उलट्यांच्या त्रासाची कैफियत मांडली.
यासोबतच, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी आणि ध्वनिप्रदूषण हा देखील एक मोठा मुद्दा बनला आहे. सुस रोड बाणेर विकास मंचचे सचिव हरेश पाटील यांनी यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “निवासी क्षेत्रात कचरा ट्रक, जेसीबी, पाणी आणि स्लरी टँकर यांच्यामुळे तीव्र ध्वनिप्रदूषण होते, जे चिंतेचा विषय आहे.”
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचेच हे आंदोलन होते. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे