दुबई , २ सप्टेंबर २०२२: आशिया चषकात झालेल्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला हा सामना दोन्ही संघांसाठी करा अथवा मरा सामना होता. दुबईच्या मैदानावर झालेला हा सामना श्रीलंकेने 2 विकेट्सने जिंकला आणि सुपर-4 फेरीत प्रवेश केला. तर पराभवासह बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे.
श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकला आणि बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. बांगलादेशच्या संघाने या संधीचा चांगला फायदा घेतला. बांगलादेशचा सलामीवीर मेहंदी हसन मिरजने संघाला दमदार सुरुवात करून दिली. मिराजने यावेळी २६ चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारली. त्यानंतर कर्णधार शकिब अल हसनने २४ धााव करत संघाची धावगती वाढवली. तर अफिफ हुसेनने बांगलादेशच्या धावगतीला चांगलाच वेग मिळवून दिला. अफिफने यावेळी २२ चेंडूंत ३९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर मोसादेक होसेनने ९ चेंडूंत नाबाद २४ धावांची तुफानी खेळी साकारली आणि त्यामुळेच बांगलादेशला १८३ धावांची मजल मारता आली.
श्रीलंकेच्या डावाची सुरूवात थोडी चांगली राहिली. सलामीला आलेल्या पथुम निसंका आणि कुशाल मेडींस यांनी ४५ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला चांगलेच अडचणी आणले होते. नऊ षटकांनंतर ४ बाद ७७ अशी धावसंख्या असताना कर्णधार दासून शनाकासह सलामीवीर कुसल मेंडिसने संघाचा डाव सावरण्या प्रयत्न केला. अखेर शेवटच्या षटकात श्रीलंकेला ८ धावांची गरज असताना दुसऱ्या चेंडूवर असिथा फर्नांडोन ने चौकार मारला, तर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत, धावसंख्या बरोबरीत आणली. मात्र, तिसरा चेंडू नो बॉल पडल्याने श्रीलंकेला सहज विजय मिळाला. दरम्यान, श्रीलंकेकडून कुशाल मेडीसने सर्वाधिक ६० तर कर्णधार दुसान शनाकाने ४५ धावा काढत श्रीलंकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या विजयासह श्रीलंकेच्या संघानं आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. श्रीलंकेसमोर 183 धावांचं लक्ष्य ठेवणाऱ्या बांगलादेशचा संघाचा विजय जवळपास निश्चित झाला होता. मात्र, गोलंदाजीदरम्यान बांगलादेशनं अनेक चुका केल्या. ज्यामुळं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ब गटामधून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर चारमध्ये प्रवेश केला आहे. तर अ गटामध्ये भारतीय संघानं सुपर 4 मधील आपलं स्थान पक्कं केले आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेता संघ सुपर चारमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव