बंगळूर : कर्नाटकातील बंगळूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चल्लकेरेला लागून असलेल्या उल्लारधी गावात भारतातील पहिले ‘ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर’ साकारले जाणार आहे. पुढच्या तीन वर्षापर्यंत याचे काम मार्गी लागणार आहे. या सेंटरमधून अंतराळवीर होण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.४७३ एकरमध्ये हे सेंटर उभारण्यात येणार असून त्यात सर्व आधुनिक सुविधा असणार आहेत.
या सेंटरच्या अंतर्गत स्पेसक्राफ्टच्या क्रू आणि सर्व्हिस मॉड्युलचे प्रशिक्षणही याठिकाणी दिले जाणार आहे.याशिवाय भारतात होणाऱ्या विविध मोहिमांचे नियंत्रण कक्षही येथेच ठेवण्यात येणार आहे. तसेच इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांकडून चालणार्या उपक्रमांचे तसेच पुरविल्या जाणार्या सोयीसुविधांचे “चल्लकेरे” हेच पुढे मध्यवर्ती केंद्र असेल.म्हणजे सर्व काम एकाच छताखाली आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. प्रशिक्षण केंद्रात एकाचवेळी तीन अंतराळवीरांना धडे देता येतील. नासामध्ये एकाचवेळ 13 अंतराळवीरांना प्रशिक्षणाची सुविधा आहे.
या सेंटर संदर्भात इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले, की गगनयान हा काही आमचे अंतराळवीरांसह अवकाशात जाणारा एकमेव प्रकल्प नाही. भविष्यात असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात येतील. गगनयानाला अंतराळात घेऊन जाणार्या ‘जीएसएलव्ही मार्क-३’ या रॉकेटचे काम तिरुवनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये सुरू आहे. क्रू आणि सर्व्हिस मॉड्युलवर बंगळुरूतील यूआर राव सॅटेलाईट सेंटरमध्ये काम चाललेले आहे.
अंतराळवीरांची निवड आणि प्राथमिक प्रशिक्षणाचे काम एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिनमध्ये चाललेले आहे. सिवन सांगतात, की या घडीला गगनयानसाठी आम्हाला आमचे अंतराळवीर प्रशिक्षणाकरिता रशियात पाठवावे लागत आहे. कोट्यवधी रुपये त्यावर आमचे खर्च होत आहेत. भविष्यात मात्र आमच्याकडे आमच्या सुविधा असतील.
भारत आता सहावा देश…
गगनयानसाठी निवड झालेल्या अंतराळवीरांना रशियातील रॉसकॉस्मोसमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे. एका अंतराळवीराच्या प्रशिक्षणावर साधारणपणे २५ ते ३० कोटी रुपये खर्च येतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. नासा (अमेरिका), ईएयू, रॉसकॉस्मोस (रशिया), जर्मनी (युरोप), स्कुबा स्पेस सेंटर (जपान) तसेच चायनीज नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (चीन) येथे सध्या प्रशिक्षणाची सुविधा आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन ते साडेतीन वर्षे आहे. हे सेंटर उभारण्यात भारत आता जगात सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे.