बाप्पा तुमच्या भेटीला! पुण्यातला ‘तांबडी जोगेश्वरी’ गणपती

Tambadi Jogeshwari

पुणे, २४ ऑगस्ट २०२०: आजचा आपला दुसरा बाप्पा असणार आहे तांबडी जोगेश्वरी. ‘बाप्पा तुमच्या भेटीला’, या सदरा अंतर्गत आम्ही आपल्यापर्यंत पुण्यातील पाच मानाचे गणपती तसेच इतर महत्वाचे गणपती आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. याच सदरा अंतर्गत आज आपण ‘तांबडी जोगेश्वरी’ या मानाच्या दुसऱ्या गणपतीला भेट देणार आहोत. यासंदर्भात व्हिडिओ देखील आमच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात तांबडी जोगेश्वरी चा इतिहास व काही रोचक गोष्टी.

तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं. पुण्यातलं हे पुरातन मंदिर असून मंदिरातील देवीची मूर्ती ही स्वयंभू असल्याचं देखील मानलं जातं. ही मूर्ती चतुर्भुज आहे. तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सवाची सुरुवात १८९२-९३ च्या दरम्यान झाली.
नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते. तिथं त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप पाहिलं. हे बघितल्यानंतर त्यांच्या मनात एक कल्पना आली की असाच सार्वजनिक गणेशोत्सव आपण पुण्यामध्ये देखील स्थापन करू. पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुण्यातील कसबा गणपती बघितला. तसेच इतर मानाचे गणपती देखील यामध्ये होते. तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. १९९४ च्या दरम्यान जवळपास १०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन झाले. त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करण्याचं कारण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवनं हे होतं. इंग्रजांच्या विरोधात सर्वांनी एकत्र यावं त्यामागे अशी भावना होती.

चतुर्थीला ब्रह्म मुहूर्त पाहून शाडू मातीची पूजा केली जाते आणि याच माती पासून तांबडी जोगेश्वरी गणपतीची मूर्ती बनवण्यास सुरुवात होते. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी या मूर्तीला बनवण्यासाठी लागतो. मूर्ती बनवण्यापासून ते मूर्ती वाळण्यापर्यंत तीन महिने जातात. या बाप्पाची मूर्ती पाहिली तर आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी हि एकमेव मूर्ती आहे. ३३ इंच उंच आणि २६ इंच रुंद अशी हि मूर्ती आहे. या मूर्तीची आगमनाची मिरवणूक रथातून तर विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते. गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय मालुंजकर यांचं कुटुंब गणेशाची मूर्ती साकारत होतं. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हि मूर्ती गिरे कुटुंब बनवत आहे.

तांबडी जोगेश्वरी मंदिराची स्थापना १५४५ रोजी त्रिंबक बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्राम देवता म्हणून ओळखली जाऊ लागली. लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा या उद्देशाने गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या उत्सवात तांबडी सुरुवात जोगेश्वरीला मानाचे दुसरे स्थान मिळाले.

तांबडी जोगेश्वरी बाप्पांचा देव्हारा आधी पितळेचा होता आणि काही काळानंतर मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या देणगीतून चांदीचा देव्हारा बनवण्यात आला. सामाजिक उपक्रमात या मंडळाचा सहभाग अग्रगण्य राहिला आहे. १९९३ मध्ये जेव्हा लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूकंप झाला होता, तेव्हा तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तू मंडळातर्फे दिल्या गेल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा