बारामती, दि. २० जुलै २०२०: बारामती शहर पोलिसांनी फरार आरोपीला सापळा रचून पकडल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून दौंड तालुक्यातील राहू येथे कारवाई करत १ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला असून बारामती शहर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुलै महिन्यात शहरातील आमराई मध्ये पोलिसांनी गांजा विक्री होत असल्याची खबर मिळाल्यावर कारवाई केली होती. यामध्ये ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. तर सुनिता प्रकाश सकट या महिलेला बारामती शहर पोलिसानी अटक केली होती. या धाड सत्राच्या वेळी दीपक प्रकाश सकट, सेवक प्रकाश सकट हे दोघे बोळीतून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
सहाय्यक पोलिस निरीक्षक पद्मराज गंपले यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून फरार आरोपींचा शोध घेतला असता गंपले यांनी सेवक सकट याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आरोपीकडे गांजा कोणाकडून खरेदी करत असल्याची कसून चौकशी केली असता दौंड तालुक्यातील राहू येथील अनिल पंढरीनाथ सायकर या हॉटेल चालकाकडून गांजा आणत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. गोपनीय विभागाने सापळा रचून सायकर यांच्या मालकीचे हॉटेल जय तुळजाभवानीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या तंदूरच्या भट्टीत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये रूपये किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आरोपीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक ओंकार सिताप, पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे, राजेश गायकवाड,सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे,अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड, पो.कॉ.कांबळे हे कारवाईच्या वेळी सहभागी होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव