इंदापूर, ९ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील आठ महिन्यांपासून रस्त्यांवर खड्डे आहेत. परंतु हे खड्डे बुजविणे किंवा रस्त्याची कामे सुरू करणे याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत खड्डयांमध्ये वृक्षारोपण केले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मतदारसंघ जोडणारा हा रस्ता आहे.
बारामती – इंदापुर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार असून ते सत्तेत देखील आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खड्डे दुरुस्ती होत नसल्याने निर्ढावलेले सार्वजनिक बांधकाम खाते कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बागायती पट्ट्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊस गळिताचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. अशातच कारखान्याला ऊस पुरवठा करणारी वाहने रस्त्यावर येणार आहेत. रस्त्यावरचे
खड्डे हा फार मोठा अडथळा ठरून नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होणार आहे. सणसर येथील बारामती – इंदापूर रोड हा तर रहदारीचा रस्ता आहे. याही रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डे आहेत. तसेच सणसर ते कुरवली या रस्त्यावर सुद्धा अनेक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर भवानीनगर लाकडी निंबोडी हा रस्ता खचुन त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले होते. परंतु याही कामाकडे ठेकेदाराचे, अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. बेलवाडी ते थोरातवाडी, सणसर रायते मळा, सणसर, रणवरे मळा, ३९ फाटा, सणसरतावशी, यासह अनेक रस्त्यांवर खड्डे पडुन रस्त्यांची खड्ड्यांनी दैना करून टाकली आहे. मात्र प्रशासन जागचे हलण्यास तयार नाही.
गावागावातील लोकांचा आंदोलनाकडे कल वाढत आहे. आजही सणसर येथे शेरपुलावर सणसरचे उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, मार्केट कमिटीचे संचालक सचिन भाग्यवंत, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास कदम यांनी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव