नवरात्र उत्सवात बारामती हादरली; देवीची ज्योत घेऊन जात असताना कोयत्याने हल्ला, तिघे गंभीर जखमी

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात नवरात्र उत्सवादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. देवीची ज्योत घेऊन जात असताना मंदिरासमोर अचानक गाडी येऊन थांबली आणि त्यातून उतरलेल्या काही जणांनी लोखंडी कोयते आणि चाकू घेऊन हल्ला केला. या घटनेत तिघांना गंभीर दुखापत झाली असून, बारामती तालुका पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल आण्णा चौधर (वय ३७, रा. वंजारवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपले भाऊ आणि कुटुंबीयांसह राशीन येथून देवीची ज्योत घेऊन वंजारवाडीतील दत्त मंदिरासमोर आले होते. पूजा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव सुरू असतानाच, एक चारचाकी वाहन तेथे येऊन थांबले. त्यातून दहा जण उतरले, ज्यांच्या हातात कोयते व चाकू होते.

पूर्ववैमनस्यातून या गटाने अचानक हल्ला चढवला. सुनिल चौधर यांना कमरेवर कोयत्याने गंभीर जखम झाली. फिर्यादी अमोल चौधर यांच्या मनगटावर वार करण्यात आला. तर भारत चौधर यांना इतकी गंभीर दुखापत झाली की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. याशिवाय आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व धमक्या दिल्या. हल्ल्याचा उद्देश जीवे मारण्याचा होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन बीएनएस कलमान्वये प्रकरण दाखल केले आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास बारामती तालुका पोलिस करत आहेत. या घटनेमुळे नवरात्र उत्सवात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील