बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत 50 लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय येथे १४ सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायदा 1954 अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपींमध्ये शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांचा समावेश होता. यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय 20, रा. वसई) फरार होता. वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने बारामती पोलिसांना माहिती दिली, की तो बारामती परिसरात असून ‘ब्रँड रिव्हर’ कपड्याच्या दुकानात काम करतो.
पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीची ओळख पटवली आणि ताब्यात घेतला. चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपी पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, पोलीस अंमलदार निलेश वाकळे, राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.
आरोपीस पुढे मीरा-भाईंदर पोलीस, तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
१३ सप्टेंबरला नालासोपारा सेंट्रल पार्कजवळ मिळालेल्या टिपच्या आधारे सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास तीन व्यक्ती त्या ठिकाणी आल्या आणि पोलिसांनी २५० ग्रॅम एम.डी. ड्रग्स जप्त केले. या ड्रग्जची बाजारात किंमत अंदाजे ५० लाख आहे. यासोबतच मोबाईल फोन व इतर पुरावेही जप्त करण्यात आले.
पुढील तपास बारामती पोलिसांनी पुढील कारवाईसह सुरु ठेवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































