बारामती तालूक्यात दूध व्यवसायाला ग्रहण

बारामती, दि.२मे २०२०: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सुरू असलेली संचारबंदी व लॉकडाऊनमुळे दुध व्यवसायाला ग्रहण लागले असल्याने दुधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

उत्पादन व मागणी यात मोठी तफावत असल्याने तसेच दुध पावडरचे दर निम्यावर आल्याने दुधाचा दर ३.५ फँट तर ८.५ एस.एन.एफ ला प्रतिलिटर बत्तीस रूपयांवरून वीस रूपयांवर आल्याने दुधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
देशात कोरोना या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले आहे. यामुळे पुर्ण देशातच लाँकडाऊन जारी केला आहे. तसेच राज्यात संचारबंदी देखील लागू केली आहे. याचा फाटका शेतीमाल, फळे, फुले तसेच दुधाला बसला आहे. मुंबई, पुणे, सांगलीसारख्या शहरी भागातून नागरीक गावाकडे ग्रामीण भागात आल्याने शहरातील लोकसंख्या निम्म्यावर आली आहे.

तसेच लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शहरातील दुकाने, हाँटेल, आईस्क्रिम शॉप्स् बंद आहेत. यामुळे दुधाच्या विक्रीत विक्रमी घट झाली असल्याने खाजगी तसेच सहकारी दुध संस्थांची दुधाची विक्री ३० ते ४० टक्क्यावर आली आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. या दिवसात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.यामुळे जनावरांना ओल्या चाऱ्याची कमतरता भासते.परंतु उन्हाची जसजशी तीव्रता जाणवते तसतशी ताक, दही, लस्सी व आईस्क्रिम सारख्या दुधाच्या उप पदार्थांना जास्त मागणी सुरू होते. यामुळे सहाजिकच दुधाला मागणी वाढते पर्यायाने दुध दर देखील वाढतो. परंतू यावेळी मात्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे शेती मालाबरोबर दुधाच्या दराला देखील ग्रहण लागले आहे.

नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांना संपर्क साधला असता, सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे महासंकट ओढावले आहे. दुध पिशवी पँकिंग तीस ते चाळीस टक्क्यावर आले आहे. उरलेल्या दुधाची पावडर बनवली जात आहे.परंतु जागतिक बाजारपेठेत दुध पावडरचे दर प्रतिकिलो ३२० रूपयांवरून १८० ते १९० रूपयांवर आले आहेत. यामुळे दुधाच्या दरात घसरण झाली आहे. तसेच जोपर्यत कोरोना चे संकट कमी होत नाही आणि जागतिक बाजारपेठेत दुध पावडर उच्चांकी दराने विकली जात नाही. तोपर्यत दुधाचे दर असेच राहतील पर्यायाने अजून कमी देखील होण्याची चिन्हे आहेत.

कात्रज दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या जगभरात कोरोना सारख्या विषाणूचे सावट पसरले असल्याने मागणी पेक्षा दुधाचे उत्पादन जास्त होत आहे. दुधापासून तयार होणाऱ्या उप पदार्थाला उठाव नाही. तसेच दुध पावडरच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. आमचा सहकारी संघ आहे. यामुळे आमच्या सारख्या सहकारी संस्थांचे दुध प्रतिलिटर पंचवीस रूपये दराने प्रतिदिन दहा लाख लिटर दुध शासन खरेदी करत असल्याने आम्हाला ३.५ फँट तर ८.५ एस.एन.एफ ला प्रतिलिटर २५ रूपये दर मिळत आहे अशी प्रतिक्रिया दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा