ढगांच्या गडगडाटासह बारामतीला पावसाने झोडपले

बारामती, १२ ऑक्टोबर २०२०: राज्यात ११ ते १७ ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रासह, कोकण भागात पाऊस जोरदार सक्रीय झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार हजेरी लावली आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहू लागले आहे. या पावसाचा कापणीला आलेल्या पिकांना धोका उत्पन्न झाला आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. सोयाबीन, कांदा, मका अनेक पिकेही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांची कमतरता असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे या संकटातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. बारामती तालुका व आसपासच्या अनेक गावात शनिवारी दुपारी आभाळ भरून आले व सर्वत्र काळोख पसरला तर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. आज रविवारी देखील सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे.

अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने राज्यात वेध शाळेने सावधानतेचा इशारा दिला आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेने माहिती दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा