इंदापूर, दि.५जून २०२०: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून बेरोजगार युवक, युवतींसाठी कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी केलेल्या अहवानाला राज्यातील ५५ हजार तरुणांनी अवघ्या दोन दिवसात ऑनलाईन अर्ज भरून प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार ( दि.५ ) जून रोजी पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, जेष्ठ नेते बाळासाहेब कारगळ उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना गारटकर यांनी माहिती दिली.
यावेळी गारटकर म्हणाले की, ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यांचे शिक्षण व अनुभव यावर आधारित अर्जांची छाननी करण्यात येणार असून पात्र व कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या सर्वांनाच रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
हा रोजगार मेळावा केवळ पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यापुरती मर्यादित हा रोजगार उपलब्ध होता. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ही संकल्पना आवडल्याने त्यांनी सोशल मिडियावर ही माहिती टाकल्याने राज्यातील ५५ हजार तरुणांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे.
राज्यातील अनेक औद्योगिक वसाहतीत काम करणारे परप्रांतीय सध्या त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे मराठी तरुणांना सध्या रोजगाराची नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मराठी तरुणांनी ही सुवर्णसंधी सोडू नये. बारामती येथील नामांकित कंपनीत दोनशे युवकांना रोजगारात उपलब्ध करून दिला आहे. अशीही माहिती गारटकर यांनी यावेळी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे