बारामती : बारामतीकरांनी केलेला हृदयसत्कार एकट्या अजित पवारांचा नव्हे तर बारामतीतील घराघरातील प्रत्येक व्यक्तिचा आहे. बारामतीकरांच्या मतांची उतराई या जन्मात होणार नाही. जनतेने त्यांची जबाबदारी पार पाडली. आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यांच्यासाठी जितकं काम करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न करेन. सत्तेची नशा डोक्यात जावू न देता गत पाच वर्षातील अनुषेश भरून काढणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्याचा अर्थमंत्री म्हणून निधी देताना विभागवार कोणताही भेदभाव केला जाणार नाही. परंतु वाढपी म्हणून बारामतीला जादा देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल, असे ते म्हणाले.
बारामती शहर व तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बारामतीकरांचे ऋण व्यक्त करताना पवार यावेळी भावूक झाले. तत्पूर्वी शहरातील कसब्यापासून ते भिगवण चौकापर्यंत पवार यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळातर्फे मिरवणूकीवर हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
पवार यांनी आपल्या भाषणात सर्व मुद्द्यांना स्पर्श केला. मी दिल्लीला गेल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत देशातील विविध भागातील खासदार भेटले. मला बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्याने ते अचंबित झाले. एवढे मताधिक्य आम्हाला खासदारकीला मिळत नाही, असे त्यांनी सांगितल्यावर उर भरून आल्याचे पवार म्हणाले.
गेली पाच वर्षे विकासकामांना पाहिजे तशी गती देता आली नाही. आता पाच वर्षे काम करायचे आहे. जिल्ह्यात दौंड वगळता अन्य ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी साथ दिली. त्यामुळे तेथील कामांचीही जबाबदारी घ्यावी लागेल, असे पवार म्हणाले.
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यासह जिरायतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता त्याबाबत काही बोलणार नाही. दिवस बदलतात, चार दिवस सासूचे तर चार दिवस सूनेचे असतात. आता सगळ्या गोष्टी नीट होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कितीही नैसर्गिक संकट आले तरी पाणी कमी पडणार नाही, असा आराखडा आम्ही तयार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. बारामतीची वाढीव पाणी पुरवठा योजना १२० कोटींवरून २०० कोटींवर नेत आहोत. येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला २०० कोटींची गरज आहे. १०० कोटी देवूनच बारामतीत आलो आहे. उरलेली रक्कम मार्चपर्यंत देण्याचा प्रयत्न राहिल. बारामतीतील राष्ट्रवादी भवनातील करिअर अॅकेडमीत अधिकाधिक सुविधा दिल्या जातील. बारामतीत मोफत डायलिसिस सेवा सुरु करण्यात येणार आहे. रुग्णकल्याण कक्ष स्थापन करून मोफत अथवा माफक दरात रुग्णसेवा उपलब्ध करून दिल्या जातील. शहरातील घरकुलांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले.
बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली काढणार आहे. पालखी मार्ग चार पदरी केला जाईल. त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. शेतकऱयांना जमिनीचा चांगला मोबदला देवू. परंतु विकास करायचा असेल तर सोसावे लागेल, असे पवार म्हणाले. बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बारामतीबरोबरच पुण्यातील मेट्रोलाही आवश्यक निधी देणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय पुरंदरचे विमानतळ गरजेचे आहे. तेथील शेतकऱ्यांचा विरोध समजून घेवून त्यांना चांगला मोबदला देवून विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. पुरंदरचे विमानतळ गरजेचे आहे. तेथून बारामती व पुणे ५०किमीच्या अंतरावर आहे. विमानतळाचा फायदा होणार असल्याने हे काम मार्गी लावावे लागेल, असे पवार म्हणाले.
अर्थ व नियोजन खात्याचा मंत्री म्हणून काम करताना नियमित कर्ज भरणाऱया शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल. दोन लाखांपेक्षा अधिक काही देता येतेय का, हे ही पाहू, असे पवार म्हणाले.
राज्यातील पोलिस कर्मचाऱयांना यापूर्वी १८० स्क्वेअर फूटाच्या घरात राहावे लागत होते. त्यांना ५०० स्क्वेअर फूटांचे चांगले घर देण्यााचा आमचा प्रयत्न आहे. बारामतीसह पुणे, मुंबईतील पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार आहे. पोलिसांचा गणवेश हाफ पॅण्टवरून फुल पॅण्ट करण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला. आता त्यांच्या घराचा प्रश्नही बारामतीकरच सोडविणार असल्याचे ते म्हणाले.
राज्य आर्थिक अडचणीत आहे. जीएसटी, विकासदर घटतो आहे. रुपयाचे अवमूल्यन होते आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम इंधन दरवाढीवर होतो आहे. सोन्याच्या किमती वाढत आहेत. कर्जमाफीपोटी शेतकऱयांच्या खात्यात हजारो कोटी रुपये भरायचे आहेत. त्यांना पुन्हा पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यासाठी पात्र करायचे आहे. काम थोडे अवघड आहे, त्याासाठी जिद्द व चिकाटी ठेवावी लागेल, सहकारी पक्षांना विचारात घेवून पुढे जाणार असल्याचे पवार म्हणाले.
———————–
वैद्यकिय महाविद्यालयाशेजारी कॅन्सर हाॅस्पिटल
बारामतीतील वैद्यकिय महाविद्यालयालगत कॅन्सर हाॅस्पिटल उभारणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यासाठी २५ एकर जागा आवश्यक आहे. मुंबईतील टाटा हाॅस्पिटलच्या धर्तीवर हे हाॅस्पिटल उभे राहिल. त्यासाठी बजाज, टाटा ट्रस्ट चे सहकार्य घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
——————————
मराठी विषय सक्तीचा
महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी लिहिता, वाचता, बोलता आले पाहिजे. अलिकडील काळात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांची संख्या वाढतेय, परंतु त्यांना मराठी येत नाही, हे दुदैव आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम होईल. परंतु मातृभाषा टिकविण्यासाठी हा निर्णय गरजेचा असल्याचे पवार म्हणाले.
—————————–
उठसूठ मुंबईला येवू नका
नव्या सरकारमध्ये अद्याप शासकिय बंगल्यांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे उठसूठ माझ्याकडे मुंबईला येवू नका. तेथे मलाच अजून मोठे घर मिळालेले नाही. त्यामुळे माझी पत्नी सुनेत्रा तेथून बारामतीला आली आहे. तुम्ही जरा समजून उमजून घ्या, उगाच तिकडे येवू नका, असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला.