बारामतीत भाजपकडून महाराष्ट्र सरकारचा निषेध

बारामती, दि.२२ मे २०२० : संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोरोनाशी लढत देत आहे. दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि राज्य सरकारच्या नेतृत्वाचे होणारे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.

कोरोनासंबंधी केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्या संदर्भातील उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करीत असताना महाराष्ट्रातील राज्य सरकार मात्र राजकारण करण्यातच मग्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा काळात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन याची माहिती घेण्याची आवश्यकता असताना तसे झालेले दिसले नाही.

वाधवान कुटुंबियांना परगावी जाण्याची परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांना रुजू करून घेतले आहे. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाणही वाढलेले असताना राज्य सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रभावी उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. राज्य सरकार या आणीबाणीच्या काळात निर्णय घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.

केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले आहे. केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वसामान्यांची, सर्व व्यापारी, शेतकरी, बारा बलुतेदार यांची अवस्था गंभीर बनली आहे. अशी परिस्थिती असतानाही राज्य सरकारने त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पॅकेज जाहीर केले नाही, ही खेदाची बाब आहे.

केंद्राचा रेशन धान्य उपलब्ध करून देण्याचा आदेश राज्याने प्रभावीपणे अंमलात आणला नाही. कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्यांच्या हितासाठी केंद्राने पाठविलेले पीपीई कीट त्यांच्या पर्यंत पोहचले नाहीत. कोविडवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अकार्यक्षम सरकारला वठणीवर आणायचे असेल तर सरकारचा जाहीरपणे निषेध करायलाच हवा अशी मागणी जोर धरत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही राज्य सरकार केवळ दिखाऊपणा करत आहे. हे जनतेचे दुर्भाग्य म्हणायला लागेल.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, ॲड. गुलाबराव गावडे, सरचिटणीस अविनाश मेटे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नितीन भामे, तालुका अध्यक्ष पांडूरंग कचरे, शहर अध्यक्ष सतीश फाळके, ज्ञानेश्वर माने उपस्थित होते. पक्षाच्या निर्देशानुसार भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात निषेध व्यक्त केला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा