पश्चिम बंगालमध्ये प्रतिकांची लढाई

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला आहे, तर तृणमूल काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकवायची आहे. त्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी प्रतिमांचा आणि प्रतिकांचा खेळ चालवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरवले आहे, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्याचा निर्धार केला आहे. एकीकडे सत्तेची आस, तर दुसरीकडे सत्ता टिकवण्याचा ध्यास यापैकी जनता कोणाला कौल देते, याकडे केवळ पश्चिम बंगालचेच नाही, तर देशाचे लक्ष लागले आहे.भारतीय राजकारणात सांस्कृतिक प्रतिकांची स्वतःची वेगळी ताकद आहे आणि अनेकदा याच घोषणा व प्रतिकांच्या माध्यमातून निवडणूक संदेश दिले जातात. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘जय मां काली’ हा उद्घोष या बदलाचा संकेत मानला जात आहे.

हा बदल केवळ एका घोषणेपुरता मर्यादित नाही, तर तो राजकीय रणनीतीच्या नव्या अध्यायाकडे निर्देश करतो. याआधी ‘जय श्री राम’ हा नारा भारतीय जनता पक्षाची ओळख बनला होता, विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतात; मात्र बंगालच्या भूमीवर हा नारा अनेकदा पक्षावर ‘बाहेरचा’ असल्याचा आरोप करणारा ठरला. अशा परिस्थितीत ‘जय मां काली’ आणि ‘जय मां दुर्गा’ यांचा वापर ही एक विचारपूर्वक आखलेली रणनीती मानली जात आहे. त्यातून भाजप स्वतःला पश्चिम बंगालच्या संस्कृती आणि भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. दीर्घकाळापासून लागलेल्या ‘बाहेरचा’ या ठपक्यापासून मुक्त होण्याचा हा व्यापक प्रयत्न असल्याचेही यातून दिसते. ‘मां काली’ आणि ‘मां दुर्गा’ या पश्चिम बंगालच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. दुर्गापूजा येथे केवळ सण नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. कालीपूजेलाही खोल धार्मिक आणि भावनिक नाते आहे. अशा वेळी या घोषणांद्वारे भारतीय जनता पक्ष हा संदेश देऊ इच्छितो, की तो पश्चिम बंगालच्या मातीचा आणि परंपरेचा सन्मान करतो. पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मतदारांना लिहिलेल्या पत्रांमध्ये आणि भाषणांमध्ये ‘जय मां काली’ चा उल्लेख केला आहे. यामागील उद्देश असा, की पक्ष केवळ राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलत नाही, तर स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीलाही स्वीकारत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कोलकात्यात महिला मोर्चाच्या सभेत महिलांना आपल्या आतली दुर्गाशक्ती जागृत करण्याचे आवाहन केले. हा उल्लेख केवळ धार्मिक संदर्भापुरता मर्यादित नव्हता, तर तो महिला सक्षमीकरणाच्या संदेशाशी जोडलेला होता.

९ ऑगस्ट २०२४ रोजी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात घडलेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तसेच ऑक्टोबर २०२५ मध्ये दुर्गापूर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. अशा प्रकारे धार्मिक प्रतिकांना सामाजिक न्याय आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांशी जोडले. देशभरात महिलांची मतदानातील भागीदारी वाढत आहे. बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत महिला मतदार निर्णायक भूमिकेत दिसून आल्या आहेत आणि बंगालही याला अपवाद नाही. अशा वेळी काली आणि दुर्गेच्या माध्यमातून महिलांशी थेट संवाद साधणे ही भाजपाची महत्त्वाची निवडणूक रणनीती मानली जात आहे.पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय जनता पक्षाला अनेकदा बाहेरचा पक्ष म्हणून सादर करण्यात आले. आता ‘जय मां काली’ आणि ‘जय मां दुर्गा’ यांसारख्या घोषणांद्वारे पक्ष पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक ओळखीपासून वेगळा नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक प्रकारचा सांस्कृतिक पुनर्ब्रँडिंगचा प्रयत्न आहे. त्यात राष्ट्रीय ओळख कायम ठेवत स्थानिक प्रतिके स्वीकारण्याची रणनीती राबवली जात आहे.‌ ‘भारत माता‌’ आणि ‌‘वंदे मातरम्‌’ची प्रतिध्वनी ‘जय मां काली’ आणि ‘जय मां दुर्गा’ यांची ध्वनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ ची आठवण करून देते.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ हे नारे राष्ट्रीय भावना व्यक्त करणारी प्रतिके बनली होती. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या आंदोलनात ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा संबंध काँग्रेसशी होता. आता त्यांचा भाजपने पुरेपूर वापर सुरू केला आहे. राष्ट्रवादाची धारा अधिक व्यापक करण्यासाठी या घोषणांचा उपयोग केला जातो. मोदी अनेकदा आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट या घोषणांनी करतात. आता ‘जय मां काली’ आणि ‘जय मां दुर्गा’ यांना जोडून भाजप राष्ट्रीय आणि स्थानिक भावनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.प्रख्यात राजकीय विचारवंत आशीष नंदी यांनी आपल्या विश्लेषणात नमूद केले आहे, की भारताला ‌‘माता‌’ म्हणून पाहण्याची संकल्पना १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये बळकट झाली. त्यांच्या मते राष्ट्रवादाने हिंदू शक्तीपरंपरा, म्हणजेच देवीपूजेची परंपरा आधुनिक राजकीय उद्दिष्टांशी जोडली. या दृष्टिकोनातून पाहिले तर ‘जय मां काली’ हा नारा केवळ धार्मिक उद्घोष नाही, तर तो एक राजकीय आणि सांस्कृतिक संकेत आहे. तो त्या परंपरेची आठवण करून देतो जिथे राष्ट्र, धर्म आणि सांस्कृतिक ओळख एकमेकांशी गुंफलेले असतात. भाजपचा ‘जय श्री राम’ पासून ‘जय मां काली’ आणि ‘जय मां दुर्गा’कडे झालेला प्रवास हा केवळ विचारसरणीचा प्रश्न नाही, तर तो सांस्कृतिक समज आणि स्थानिक भावनांची ओळख पटवण्याचा प्रयत्न आहे. ‘जय श्री राम’ पासून ‘जय मां काली’कडे वाटचाल करणे म्हणजे पश्चिम बंगालच्या भूमीवर वेगळी रणनीती स्वीकारण्याची तयारी दर्शवणे होय, जेणेकरून लोकांशी तळागाळात नाते जोडता येईल; मात्र खरी कसोटी ही केवळ घोषणा बदलण्याची नसून त्या शक्तिशाली प्रतिकांना प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित करण्याची आहे. ही प्रतिके खरोखरच तळागाळात बदल घडवतील का? महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जातील का? सांस्कृतिक जोड सामाजिक न्यायात रूपांतरित होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.पश्चिम बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक केवळ सत्तांतराची शक्यता किंवा राजकीय आकडेमोडीची लढाई नाही; तर ती प्रतिमा, प्रतीक, अस्मिता आणि रणनीती यांच्या संगमावर उभी आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात आपली पायाभरणी अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आपले प्रादेशिक वर्चस्व टिकवण्यासाठी सज्ज आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लक्षणीय वाढ दाखवली; परंतु सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे या वेळी पक्ष अधिक सूक्ष्म पद्धतीने काम करताना दिसतो. भाजप राष्ट्रीय सुरक्षेचे, नागरिकत्व कायद्याचे, सीमावर्ती प्रश्नांचे आणि घुसखोरीसारख्या मुद्द्यांचे भांडवल करेल. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांचा लाभार्थी वर्ग विशेषतः महिला, गरीब आणि अनुसूचित जाती-जमाती यांच्याशी थेट संवाद साधण्याची रणनीती असेल. महिलांची वाढती मतदानातील भूमिका लक्षात घेता, महिला सक्षमीकरण, सुरक्षा आणि आर्थिक मदतीच्या योजनांवर विशेष भर दिला जाईल. दुर्गा आणि कालीच्या प्रतिकांद्वारे नारीशक्तीचा संदेश देत महिलांना भावनिक आणि राजकीय पातळीवर जोडण्याचा प्रयत्न होईल.

बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसची रणनीती अधिक स्पष्ट आहे. ‘बंगाल विरुद्ध बाहेरचा’ हा संघर्ष उभा करण्यावर या पक्षाचा भर राहील. ‘बंगालची मुलगी’ ही प्रतिमा अधिक ठळक करण्याचा त्यांचा भर आहे. बॅनर्जी स्वतःला साध्या, लढाऊ आणि पश्चिम बंगालच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या नेत्या म्हणून सादर करतात. ‘बंगाल निजेर मेयेके चाय’ (बंगालला आपलीच मुलगी हवी) ही पूर्वीची हाक पुन्हा नव्या स्वरूपात समोर येऊ शकते. कल्याणकारी योजनांचे भांडवल, लक्ष्मी भंडार, कन्याश्री, रूपश्री यांसारख्या राज्यस्तरीय योजनांचा उल्लेख करून तृणमूल काँग्रेस महिला आणि गरीब मतदारांमध्ये आपला विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करेल. प्रत्यक्ष लाभ दिल्याचा दावा करून त्या काम करणारे सरकार अशी प्रतिमा उभी करतील. तृणमूल काँग्रेस भाजपवर ध्रुवीकरणाचा आरोप करत स्वतःला सर्वधर्मसमभावाची बाजू घेणारा पक्ष म्हणून सादर करेल. मुस्लिम मतदारांचा पाठिंबा टिकवून ठेवणे हेही या पक्षाचे एक महत्त्वाचे ध्येय असेल. या निवडणुकीत प्रतिमा हीच सर्वात मोठी रणभूमी असेल. दुर्गापूजा, कालीपूजा, सरस्वती पूजा यांसारख्या सणांच्या वेळी दोन्ही पक्ष आपापल्या उपस्थितीने सांस्कृतिक सहभाग दाखवतील. राजकीय इतिहास सांगतो, की प्रतिके प्रभावी असतात; पण ती दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रत्यक्ष कामगिरीची जोड आवश्यक असते. पश्चिम बंगालमधील बेरोजगारी, उद्योग, शिक्षण, महिला सुरक्षा आणि ग्रामीण विकास हे मुद्दे शेवटी निर्णायक ठरतील. भाजपसाठी आव्हान असेल, ते म्हणजे सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी प्रतिकांना स्थानिक विश्वासात रूपांतरित करणे, तर तृणमूल काँग्रेससाठी कसोटी असेल, ती सत्ताधाऱ्यांविषयीची नाराजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देत आपली विश्वसनीयता कायम ठेवणे. मतदार त्यातून कोणाची निवड करतात, यावर दोन्ही राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून असेल.

भागा वरखडे