नागपूर, ५ ऑक्टोबर २०२२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. या मुद्द्यावरून आम्हाला समाजातील कोणत्याही घटकाला घाबरवायचे नाही. ज्या लोकांना भीती वाटते अशा अल्पसंख्याक घटकांशी आम्ही अनेक दिवसांपासून संवाद साधत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. काही लोक भोळे बनवून येतात आणि परिस्थितीनुसार राष्ट्र विरोधी लोक वागतात अशा लोकांपासून आपण सावधान राहिले पाहिजे असे परखड मत भागवत यांनी स्वयंसेवकां समोर मांडले.
विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस असल्याने संघ परिवारात याला मोलाचे महत्त्व आहे. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. यानंतर प्रत्येक वर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. स्वयंसेवकांकडून पथसंंचालन करून हा स्थापना दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. संघाच्या इतिहासात प्रथमच या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट सर करणाऱ्या पद्मभूषण महिला संतोष यादव यांना बोलवण्यात आले. यावेळी मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, देशामध्ये मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी धोरण आले आहे. परंतु तुमची सही, घरावरची नावाची पाटी तुम्ही मातृभाषेत ठेवणार नसाल तर या धोरणाचा काय फायदा. केवळ इंग्रजी भाषेत शिक्षण घेतल्याने व्यक्तिमत्व घडत नाही, मोठे लोक आपल्या मातृ भाषेत शिकलेले आहेत. शिक्षणासोबत इतर ज्ञान मिळवणे ही तुमच्यासाठी गरजेचे आहे असेही भागवत म्हणाले.
विकास साधण्यासाठी पुढे जाण्यासाठी लवचिकता गरजेची आहे त्यामुळे प्रगती होते. त्याचबरोबर सहचितता गरजेची आहे. सनातन मूल्ये सोडून काम होत नाही. मात्र परिवर्तन आवश्यक आहे. परंतु मूळ उद्देशापासून न भटकता यासाठी सनातन मूल्यावर तुमचा पाय मजबूत असणे गरजेचे आहे असेही भागवत यावेळी म्हणाले.
संपूर्ण समाजाला श्रेष्ठ बनवायचे असेल. तर स्त्री पुरुष असा भेदभाव करून चालणार नाही. तशी आमची संस्कृती राहिली आहे. महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. ते समाजासाठी पूरक आहे. आपली काय विस्मृती झाली ज्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष केले. मध्ययुगीन काळात महिलांना सुरक्षेच्या नावाखाली आपण घरामध्ये ठेवले. पुढे जाऊन ती परंपरा बनली. देशात मातृशक्ती जे करू शकते ते पुरुष करू शकत नाही. मातृशक्तीच्या जागृतीचे कार्य आपल्या सर्वांना आपल्या घरापासून सुरू करणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी सांगितले.
दिवसेंदिवस संपूर्ण जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. युक्रेन-रशिया युद्धावर भारत सरकारने ज्याप्रकारे भूमिका घेतली त्याचे मोहन भागवत यांनी प्रशंशा केली आहे. राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. यापुढे फक्त सरकारी नोकरीच्या पाठीमागे धावणे चुकीचे आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर पर्यायांचाही विचार करायला हवा. रोजगार निर्मितीसाठी आम्हाला सरकारला मुक्त करायचे नाही. तर सरकारवर लक्ष ठेवायचे आहे. रोजगार निर्मितीत नागरिकांची महत्वाची भूमिका असल्याचे मतही भागवत यांनी व्यक्त केलं.
लोकसंख्या वाढीला समस्या म्हणून नाही तर युवा लोकसंख्या किती उपयोगी आहे हे महत्वाचे आहे. परंतु पुढच्या ५० वर्षाचा विचार करून लोकसंख्या नियोजित ठेवणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढीमध्येही समतोल साधने गरजेचे आहे, अवाढव्य लोकसंख्या वाढ ही राष्ट्राच्या विघटनाला कारणीभूत ठरते. यामुळे असंतुलित लोकसंख्या वाढ व घुसखोरीमुळे जी लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीने वाढत आहे. यावर सरकारकडून कठोर कायदा होणे गरजेचे आहे व त्याची अंबलबजावणी कठोर पद्धतीने करण्यात यावी अशी मागणीही मोहन भागवत यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर